रक्ताचे नमुने बदलणार्‍या आरोपींचा जामीन फेटाळला   

कल्याणीनगर अपघात प्रकरण

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये अलिशान मोटारीमध्ये मागील आसनावर बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणी आरोपी आशिष मित्तल आणि अरुणकुमार सिंग यांना अटक केली असून, त्यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, या गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य, शिक्षेची तीव्रता व आरोपींविरोधात पुरावे, साक्षीदार व व्यापक समाजहिताला बाधा पोहोचण्याची सरकार पक्षाची भीती या सर्व बाबी लक्षात घेऊन विशेष न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.आशिष सतीश मित्तल आणि अरुणकुमार देवनाथ सिंग अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. कल्याणीनगर येथे १८ मे २०२४ च्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने अलिशान मोटार भरधाव वेगाने चालवून धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. मोटारचालक मुलगा आणि पाठीमागील आसनावर बसलेल्या त्याच्या दोन मित्रांनी अपघातापूर्वी मुंढव्यातील दोन पबमध्ये मद्यपान केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी या सर्वांना ससून रुग्णालयात नेण्यात आले. 

Related Articles